मराठीतील उत्तम साहित्य वाचनाने मराठीचे संवर्धन करता येईल-साहित्यिक चंद्रशेखर भारती

चोपडा प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागातर्फे ‘मराठी राजभाषा संवर्धन पंधरवडा निमीत्त  कल्याण येथील आखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक चंद्रशेखर भारती यांचे ‘मराठी भाषा संवर्धनात युवकांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

याप्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. के. एन.सोनवणे, सौ. एम. टी. शिंदे, पंकज कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक, रजिस्ट्रार श्री. डी. एम. पाटील आदि मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ. के. एन. सोनवणे यांनी करून दिला.

या कार्यक्रमाप्रसंगी साहित्यिक चंद्रशेखर भारती  ‘मराठी भाषा संवर्धनात युवकांचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘मराठी भाषा चंद्र, सूर्य अस्तित्वात असेपर्यंत जीवंत राहील. मराठी भाषेला दोन हजार वर्षांपेक्षा अधिक वर्षांचा उज्वल इतिहास आहे. मराठी भाषा ही स्वयंपूर्ण असून ती प्राकृत भाषेचे रूप आहे. अनेक भाषांना स्वयंपूर्ण बनविण्यात मराठी भाषेचे योगदान आहे हे नाकारता येणार नाही. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आपण स्वतः अगोदर मराठी भाषेत बोलायला हवे. तरुणांनी मीडियावर लेखन करतांना मराठीचा वापर करावा. मराठीतील सण, वार, उत्सव, मराठी महिने यांची माहिती करून घ्यावी. मराठी चित्रपट बघावेत, मराठीतील उत्तम व दर्जेदार पुस्तकांचे वाचन करावे. वाढदिवसाला मराठी पुस्तके भेट द्यावीत या कृतीने मराठी भाषा संवर्धनात सकारात्मक पाऊल पडेल यात शंका नाही. यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करायला हवी अशी खंत व्यक्त केली.

 

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य वाचायला हवे तसेच एकमेकांशी बोलताना मराठी भाषेत संवाद साधला पाहिजे. आपण आपली जन्मभाषा बोलली तरच ती टिकेल. विद्यार्थ्यांनी जीवन व्यवहारात मराठीचा वापर करणे मराठीच्या संवर्धनासाठी गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एम.एल.भुसारे यांनी केले तर आभार जी.बी. बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी ऑनलाईन उपस्थित होते.

Protected Content