मराठा नेतृत्वाला संपविण्याचे उध्दव ठाकरेंचे प्रयत्न : रामदास कदम यांचा आरोप

 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा नेत्यांना मोठे होऊ द्यायचे नाही या भावनेतून उध्दव ठाकरे काम करत असून याचमुळे मला आणि माझ्या मुलाला संपविण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी केला. याप्रसंगी त्यांनी ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

रामदास कदम यांनी अलीकडच्या काळात थेट उध्दव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. आज पुन्हा त्यांना ठाकरे पिता-पुत्राला टार्गेट केले. आदित्य यांचे शिवसेनेच्या उभारणीत योगदान काय ? असा सवाल त्यांनी विचारलाय. उध्दव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली आहे. नवीन शिवसैनिक आणि नवी पिढी असल्याने तुमच्या भावनेच्या जाळ्यात अडकेल परंतु, जुन्या बर्‍याच शिवसैनिकांचे खून झालेत. अनेकांचे संसार उद्धवस्त झालेत. अनेकजण देशोधडीला लागले हे विसरून चालणार नाही. या सगळ्यांच्या बलिदानानंतर आणि लढाईनंतर शिवसेना उभी झाली आहे. संजय राऊत शिवसेना एकत्र ठेऊ शकतील का?, असा सवालही त्यांनी सेनेला केला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंना मराठा समाजातील नेत्यांना मोठ होऊ द्यायंच नाही. ठाकरेंनी तीन वर्ष मला बोलू दिलं नाही, रुग्णालयात असताना सहा बैठका झाल्या. मात्र आम्हाला आमंत्रण नव्हते. त्यामुळे तुम्ही रामदास कदम किंवा योगेश कदम यांना नाही तर कोकणतील शिवसेनेला संपवत आहात, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.

Protected Content