मुंबई : वृत्तसंस्था । मराठा आरक्षणासंदर्भात घटनापीठ स्थापन करण्याबाबतच्या शासनाच्या अर्जावर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सरन्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टात सांगितले, अशी माहिती मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
चव्हाण म्हणाले, “शासनाचे वकील व ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधीशांनी मराठा आरक्षणासंदर्भात घटनापीठ स्थापन करण्याबाबत सूतोवाच केले. यासंदर्भात घटनापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने सुप्रीम कोर्टात तिसरा अर्ज दाखल आहे.”
यापूर्वी सुप्रीम कोर्टाने ९ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. याचा मोठा परिणाम राज्यातील मराठा तरुणांवर झाला असून शासकीय नोकऱ्या, शैक्षणिक आरक्षण त्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबल्या आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टात राज्य शासनाने आता तिसऱ्यांदा विनंती अर्ज सादर केला आहे. यामध्ये कोर्टाने आपला अंतरिम आदेश रद्द करावा यासाठी घटनापीठासमोर तातडीने सुनावणी करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
यापूर्वी ७ आणि २८ ऑक्टोबर रोजी शासनाने सुप्रीम कोर्टात अर्ज सादर केले होते. रोहतगी यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्याने सरन्यायाधिशांनी यावर लवकरच विचार केला जाईल असे सांगितले.