मनसेच्या शॅडो कॅबिनेटबाबत उत्सुकता शिगेला

नवी मुंबई प्रतिनिधी । मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त आज होणार्‍या मेळाव्यात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात येणार असून यात कुणाकडे नेमकी काय जबाबदारी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोमवारी पक्षाचा १४ वा वर्धापनदिन साजरा करणार असून यानिमित्त नवी मुंबईत होणार्‍या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. नवी मुंबईतल्या विष्णुदास भावे सभागृहात मनसेचा मेळावा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. जवळजवळ अडीच तास ही बैठक चालली होती. बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आदी मनसे नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटवर बरीच चर्चा केली.

दरम्यान, आजच्या मेळाव्यात पक्षाच्या शॅडो कॅबिनेटचीही घोषणा होण्याचे संकेत आहेत. यात गृहमंत्रिपदी बाळा नांदगावकर, वित्त मंत्रिपदी नितीन सरदेसाई, तर नगरविकास मंत्रिपदी संदीप देशपांडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम शॅडो कॅबिनेट करेलच, परंतु या सरकारच्या दैनंदिन कारभारावर लक्ष ठेवण्यासाठीही मनसेची ही टीम काम करणार आहे.
मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये गृहमंत्रिपदी बाळा नांदगावकर, नगरविकास मंत्रिपदी संदीप देशपांडे, सांस्कृतिक मंत्री अमेय खोपकर, सहकार मंत्री दिलीप धोत्रे, महिला व बालकल्याण मंत्री म्हणून रिटा गुप्ता आणि वित्तमंत्रिपदी नितीन सरदेसाई अशा २५ ते २८ मंत्र्यांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.

Protected Content