वंचित आघाडी सोडलेल्या नेत्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक

मुंबई प्रतिनिधी । नुकतीच वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिलेल्या ४६ नेत्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याोबत प्रदीर्घ बैठक झाली. यामुळे ते राष्ट्रवादीत जाणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत खातेही उघडू शकली नव्हती. यानंतर आघाडीतील ४६ नेत्यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये पक्षाला रामराम ठोकला होता. या गटाची काँग्रेस व राष्ट्रवादीशी बोलणी चालू होती. या पार्श्‍वभूमिवर, शरद पवार यांनी वंचितच्या माजी नेत्यांशी चर्चा केली. फोर्ट परिसरातील प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व छगन भुजबळ उपस्थित होते. बैठकीला वंचितचे माजी प्रदेश महासचिव नवनाथ पडळकर, माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरसकर, वंचितच्या देखरेख समितीचे अध्यक्ष अर्जुन सलगर, हनुमंत वाक्षे, सदानंद माळी, बापूसाहेब हटकर, अब्दुल रौफ, बिस्मिल्ला खान आदी नेते हजर होते.

याप्रसंगी संबंधीत नेत्यांनी राष्ट्रवादीसमोर काही अटी ठेवल्या. यात प्रामुख्याने धनगर समाजाच्या आदिवासी आरक्षणाची अंमलबजावणी करावी. मुस्लिम आरक्षण कायदा मंजूर करावा. भटके, विमुक्तांना घरकुल द्यावे. ओबीसी, धनगर, भटके आणि मुस्लिम नेत्यांना पक्षात योग्य प्रतिनिधित्व मिळावे. महिलांच्या योजनांना जिजाऊ, सावित्री, माता रमाई, अहिल्यादेवींची नावे द्यावीत आदी मागण्यांचा समावेश आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अनुकुल भूमिका घेतल्यास आपण या पक्षात येऊ असा प्रस्ताव या नेत्यांनी दिल्याचे समजते. याबाबत नेमका काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content