जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शहरातील काशिनाथ लॉजजवळ एक बस थांबवून यावरील औरंगाबाद हे नाव बदलून संभाजीनगर नाव असणारी पाटी लावली.
याबाबत वृत्त असे की, औरंगाबाद या नावाऐवजी संभाजीनगर असे नामकरण करावे, अशी मागणी मनसेने केलेली आहे. स्थानिक मनविसे पदाधिकार्यांनी यासंबंधीचे निवेदनही आगार प्रशासनास दिले होते. दरम्यान बुधवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास जळगावहून औरंगाबादकडे जाणार्या नवापूर- वैजापूर या बसवर (एमएच- २०, बीएल -३७७९) औरंगाबाद असे लिहिले असल्याचे दिसून आल्याने मनविसेच्या कार्यकर्त्यांनी ही बस काशिनाथ हॉटेल चौफुलीजवळ रोखली. या वेळी ही पाटी बदलून कार्यकर्त्यांनी आणलेली जळगाव- संभाजीनगर या फलकाची पाटी बसमध्ये लावून ती बस रवाना करण्यात आली.
यासोबत एसटी बसेसची सुधारण करावी, परीक्षेचे दिवस असल्याने बसेस वेळेवर सोडाव्यात यासह आगारात वृद्ध, महिला, विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणी, बसण्यासाठी बेचेंसची व्यवस्था करावी अशी मागणीही केली आहे. या उपक्रमावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, शहराध्यक्ष योगेश पाटील, तालुकाध्यक्ष मुकूंद रोटे, चेतन पाटील, पंकज चौधरी, कुणाल पाटील, संदीप पवार आदी याप्रसंगी उपस्थित होते.