मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने दलालांविरूद्धची मोहीम केली तीव्र

जळगाव, प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांचा काळाबाजाराचा धोका रोखण्यासाठी दलालांविरूद्ध मोहीम अधिक तीव्र केली. त्यांनी मुंबई विभागात २२ दलालांना पकडून त्यांच्याकडून ६,०९,२९८ किंमतीची ३२८ लाइव्ह ई-तिकिटे जप्त केली आहेत.

रेल्वेने १२ मे २०२० पासून १५ गाड्या वातानुकूलित विशेष गाड्या सुरू केल्या आणि त्यानंतर १ जून २०२० रोजी निवडक विशेष मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या १०० गाड्यांची घोषणा केली. अनेक वैयक्तिक आयडी वापरुन ई-तिकिटे काढण्याची आणि या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित जागा बळकावण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या होत्या. दलालांविरूद्धच्या या मोहिमेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेल व इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषतः खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापेमारी केली. लॉकडाउन आणि अनलॉक कालावधी दरम्यानच्या या छाप्यांत सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले आणि ८,६२,१९१ किंमतीची ४७९ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली. आतापर्यंत या लॉकडाऊन व अनलॉकच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने मुंबई विभागात २२ दलाल पकडले व त्यांच्याकडून ६,०९,२९८ किंमतीची ३२८ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याविरूद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, या कोविड-१९ साथीच्या काळात रेल्वेच्या सामाजिक जाणिवेच्या प्रत्येक बाबीमध्ये मध्य रेल्वे आरपीएफची टीम अग्रभागी कोरोना योद्धा म्हणून उभी राहिली आहे. रेल्वे मालमत्तेचे रक्षण, रेल्वेच्या आवारात आणि प्लॅटफॉर्मवर श्रमिकांच्या प्रवेशाचे नियमन आणि लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या प्रवाशांना अन्न पॅकेटचे वितरण त्यांनी केले. लहान मुलांची सुटका करून त्यांच्या कुटूंबियांशी पुन्हा भेट घालून देण्यासाठी, श्रमिक विशेष गाडीत ज्येष्ठ नागरिकांना किंवा अपंग प्रवाशांना ट्रेनमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी, गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकीय सहाय्य करण्यासह ट्रेनमध्ये बसण्यास मदत केली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी सहका-यांसाठी नाविन्यपूर्ण मास्कही त्यांनी तयार केले. गुन्हेगारांवर नजर ठेवून अंमली पदार्थ, ट्रेनमध्ये चोरलेले मोबाइल फोन इत्यादी जप्त करण्याचे काम ते चोखपणे करीत आहेत.

Protected Content