भोपाळ : वृत्तसंस्था । मध्य प्रदेशातील. सत्तेत पुन्हा विराजमान होऊ पाहणाऱ्या काँग्रेसला २८ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत यश मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, त्या आशेवर पाणी फेरलं गेलं असल्याचं दिसत आहे. २८ जागांपैकी एका जागेवर विजयी मिळवला असून, १९ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे.
मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचं सरकार कोसळलं होतं. यावेळी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदारांचं सदस्यत्व पक्षांतरांमुळे रद्द झालं होतं. त्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी सत्तेचा दावा करत सत्ता स्थापन केली.
त्यानंतर २८ जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे मध्य प्रदेशात स्थिर सरकार की पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणार यासाठी पोटनिवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षांनी या निवडणुकीसाठी वर्चस्व लावलं होतं. ज्योतिरादित्य शिंदे यांनीही आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर घणाघात केला होता.
निवडणूक निकालातून मध्य प्रदेशात भाजपाचं स्थिर सरकार स्थापन होत असल्याचं दिसून येत आहे. २८ जागांपैकी १ जागेवर भाजपानं विजय संपादित केला असून, तब्बल १९ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसने ७ जागांवर आघाडी घेतली आहे. एका ठिकाणी बसपा उमेदवार आघाडीवर आहे.
भाजपाला सत्ता टिकवून ठेवण्यासाठी ८ जागा जिंकणं आवश्यक आहे. मध्य प्रदेश विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २३० आहे. आमदार राहुल सिंह यांनी राजीनामा दिल्यानं सध्या २२९ आमदार आहे. त्यामुळे बहुमतासाठी ११५ जागांचं बहुमत असणं आवश्यक आहे.