नवी दिल्ली वृत्तसंस्था । मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अल्पमतात आले आहे. ज्योतिरादित्य समर्थक काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामे दिल्याने मुख्यमंत्री कमलनाथ यांना आता उद्या बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
मध्यप्रदेश विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विश्वादर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या डावपेचांकडे लक्ष लागले आहे. मध्यप्रदेशात भाजप विश्वासाने मैदानात उतरला. भाजपचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान, नेते गोपाल भार्गव आणि डॉ. नरोत्तम मिश्र हे परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जावा, ही भाजपची आधीपासूनची मागणी आहे. राज्यपाल अभिभाषणातून सरकारच्या कामांचा आढावा घेतात. पण सरकारच अल्पमतात असल्याने त्याचा प्रश्नच येत नाही, असं भाजपचं म्हणणं आहे.
काँग्रेस २२ बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्र्याकडे आपले राजीनामे सादर केले आहेत. हे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनीही स्वीकारले तर त्या आमदारांचे सदस्यत्व संपुष्टात येईल. विधानसभा अध्यक्षांनी ६ मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी सर्वांचे राजीनामे मंजूर केले तर बहुमतासाठी १०४ आमदारांची आवश्यकता पडते. अशा वेळी भाजपने १०४चा आकडा पूर्ण केल्यास कमलनाथ सरकार पडू शकतं, असं सांगण्यात येत आहे. पण विधानसभा अध्यक्षांनी राजीनामे फेटाळले तर पक्षाकडून त्यांना व्हिप जारी केला जाईल. यानुसार आमदारांना सभागृहात उपस्थित राहावं लागेल.