भोपाळ : वृत्तसंस्था । मध्यप्रदेश सरकार आता लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे की, आम्ही विधानसभेत लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहोत. हा अजामीनपात्र गुन्हा असेल आणि दोषींना पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असेल.
या अगोदर उत्तर प्रदेश, हरियाणा व कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले की, आगामी विधानसभा सत्रात शिवराजसिंह सरकारकडून लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर धर्म स्वातंत्र्य कायद्यासाठी विधेयक सादर केले जाईल आणि कायदा तयार झाल्यानंतर अजामीनपात्र कलमांतर्गत खटला दाखल करून दोषींना पाच वर्षांपर्यंत कडक शिक्षा दिली जाईल.
नरोत्तम मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, लव्ह जिहादसाठी मदत करणाऱ्यांना देखील मुख्य आरोपीप्रमाणेच शिक्षा दिली जाईल आणि विवाहासाठी धर्मांतरण करायला लावणाऱ्यांना देखील शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात असेल. , स्वतःच्या इच्छेने धर्म परिवर्तन करून विवाह करण्यासाठी संबंधित व्यक्तीला एक महिना अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे. जबरदस्ती करून व धमकावून केलेला विवाह, ओळख लपवून केलेला विवाह या कायद्यानंतर रद्द मानला जाईल.
या अगोदर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील, लव्ह जिहाद विरोधात मोठं विधान केलेलं आहे. याचबरोबर हे देखील स्पष्ट केलं आहे की, मध्य प्रदेशमध्ये अशा घटना समोर आल्यावर त्यावर कडक कारवाई केली जाईल. लवकरच देशात लव्ह जिहादविरोधात कडक कायद्याची अंमलबजावणी केली जाईल.