इम्फाळ (वृत्तसंस्था) भाजप समर्थक ६ आमदारांनी बंडखोरी केली आहे. तर भाजपच्या तीन आमदारांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे.
सुभाषचंद्र सिंह, टीटी हॉकीप आणि सॅम्युएल जेंदाई या भाजपच्या तीन आमदारांनी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देऊन विरोधीपक्ष काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय तृणमूल काँग्रेसचे एकमेव आमदार टी. रोबिंद्रो सिंह आणि अपक्ष आमदार शहाबुद्दीन यांनीही भाजपचा पाठिंबा काढून घेतल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री वाय जॉयकुमार सिंग, कॅबिनेट मंत्री एन कायसी, एल जयंत कुमार सिंह आणि लेटपाओ होकीप यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. बिरेन सिंह सरकारला राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे.