नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारताची अर्थव्यवस्था यंदाच्या आर्थिक वर्षांमध्ये ९ टक्क्यांनी घसणार असल्याचे एशियन डेव्हलपमेंट बँकेने म्हटलं आहे. या बँकेच्या अंदाजानुसार कोरोनाचा देशातील आर्थिक परिस्थितीवर खूपच वाईट परिणाम झाला आहे. कोरोनाच्या साथीचा परिणाम ग्राहकांच्या विचारसरणीवर झाला आहे. त्यामुळे बाजारपेठांमधील मागणी मंदावली आहे. मंदावलेल्या मागणीमुळे बाजारपेठांची आर्थिक पडझड झाल्याचे चित्र दिसत आहे.
एकीकडे आता परिस्थिती बिकट राहणार असल्याचे बँकेने अहवालात म्हटलं असलं तरी दुसरीकडे पुढील आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा दर आठ टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या बाजारपेठांमध्ये मागणी मंदावल्याने पुढील वर्षी मागणी पुर्ववत झाल्यानंतर बाजारपेठांची आर्थिक परिस्थिती सुधारेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच आता भारतीय अर्थव्यवस्थेला थेट २०२१-२२ मध्येच ‘अच्छे दिन’ पहायला मिळतील असंच या अहवालातून एशियन डेव्हलपमेंट बँकेने म्हटलं आहे.
एशियन डेव्हपलपमेंट बँकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ यासुयुकी सवादा यांनी, “कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भारताने मोठ्याप्रमाणात निर्णय घेत अनेक गोष्टी लॉकडाउन केल्या होत्या. त्याचा अर्थव्यवस्थेवर खूपच वाईट परिणाम झाला आहे,” असं निरिक्षण नोंदवलं आहे. भारताच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्येही मोठी पडझड होईल हा एशियन डेव्हलपमेंट बँकेने व्यक्त केलेला अंदाजही अगदी योग्य ठरला होता.
सोमवारीच एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज या पतनिर्धारण संस्थेने प्रादुर्भावाचा गुंतवणुकीवर व क्रयशक्तीवर विपरीत परिणाम दीर्घकाळासाठी होणार आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात (एप्रिल २०२० – मार्च २०२१) भारताची अर्थव्यवस्था तब्बल नऊ टक्क्यांनी आकुंचन पावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.
भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे ३१ ऑगस्ट रोजी समोर आलेल्या आकडेवारीमधून स्पष्ट झालं होतं. त्यानंतर जगभरातील वेगवेगळ्या संस्थांनी भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त करणारी आकडेवारी जारी केली आहे.