मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची तयारी सुप्रीम कोर्टाने दर्शवली होती. परंतु आता तातडीची सुनावणी प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक हे मनी लोंड्रिंग /आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अटकेत आहेत. इडीच्या या अटकेला आव्हान देणारे राष्ट्रवादीचे नेते मलिक यांच्या याचिकेवर मलिक यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांच्या युक्तिवादाची नोंद घेण्यात आली होती.
त्यानुसार सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची तयारी सुप्रीम कोर्टाने दर्शवली होती. परंतु आता मंत्री मलिक यांना सुप्रीम कोर्टाने तगडा झटका दिला असून सुप्रीम कोर्टानेच या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
दाऊद इब्राहीम टोळीच्या क्रिकेट सट्टेबाजीसह बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप सक्त वसुली संचालनालय अर्थात इडी कडून दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. दाऊद हस्तकाशी संबंधित मालमत्ता व्यवहार प्रकरणी मलिक यांचा संबंध ‘ईडी’ च्या तपासात आढळून आला आहे. या आरोपावरून ईडीकडून मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार/ मनी लोंड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती .