मंत्री अब्दुल सत्तार घेणार मदत कार्याचा आढावा

चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यात काल अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीची पाहणी तसेच मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी आज महसूल व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे तालुक्यात येत आहेत.

 

याबाबत वृत्त असे की, सोमवार सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगावसह परिसरात प्रचंड हानी झाली आहे. याचा फटका पाचोरा आणि भडगाव तालुक्यालाही बसला असला तरी तो तुलनेत कमी आहे. चाळीसगाव शहरासह तालुक्याला याचा मोठा फटका बसला आहे.  महसूल प्रशासनाच्या अहवालानुसार  चाळीसगाव तालुक्यातील खालील नमुद गावे आणि चाळीसगाव शहरातील सखल भागातील अंदाजे ५० ते ६० घरांत पाणी शिरले आहे. कन्नड घाटात मोठया प्रमाणावर दरड कोसळल्यामुळे अनेक वाहने रात्रीपासून अडकून पडली आहेत. या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एसडीआरएफचे पथक पोहचले असुन, घाटातील दरड हटविण्याचे व अडकलेली वाहने काढण्याचे काम सुरु आहे.  अतिवृष्टीमुळे १५५ लहान तर ५०६ मोठी गुरे वाहून गेली आहेत. जोरदार पावसामुळे ३८ घरे पूर्ण तर ६३७ घरे अंशत: वाहून गेली आहेत. तर पाण्यामुळे ३०० दुकानांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज या अहवालात वर्तविण्यात आलेला आहे. तर अतिवृष्टीमुळे १५१९५ हेक्टर क्षेत्रावरील पीक आणि फळ पीकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कालच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह माजी मंत्री आ. गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकसानीची पाहणी केली होती. यानंतर आज महसूल, खार जमीनी विकास, बंदरे, तथा विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दुपारी अडीच वाजता चाळीसगावात येत आहेत. ते नुकसानीची पाहणी करून मदत कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या दौर्‍याबाबत जिल्हा माहिती कार्यालयाने अधिकृत घोषणा केली आहे.

Protected Content