मुक्ताईनगर : प्रतिनिधी । हार्वेस्टरने अचानक ब्रेक लावल्याने त्याला पाठीमागून मंडप वाहतूक करणारे वाहन धडकल्याने धाबे पिंपरी शिवारात झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले
मुक्ताईनगर – बऱ्हाणपूर रस्त्यावरील धाबे पिंपरी शिवारात समोर चाललेल्या हार्वेस्टरने अचानक ब्रेक दाबल्याने मागून मुक्ताईनगर येथून शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे मंडप डेकोरेशन काढून परत येत असलेल्या मालवाहू चार चाकी वाहनाला झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना एक एप्रिल रोजी घडली.
मुक्ताईनगर पोलिसात विनोद चौधरी ( वय 44 , धंदा विनोद टेन्ट हाऊस, रा- बँक ऑफ इंडिया समोर मेन रोड शहापूर, तालुका ; बऱ्हाणपूर मध्यप्रदेश ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे मंडप व डेकोरेशन व्यवसाय आहे 31 जानेवारी रोजी मुक्ताईनगर येथे शिवजयंती उत्सवानिमित्त प्रवर्तन चौकात शिवजयंतीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री खुशाल महाजन, राजू महाजन, बाळू सोनवणे तसेच मयुर राखुंडे (चालक) हे चौघे रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास मालवाहू टाटा 207 मालवाहू गाडी ( क्र एम पी 09 जी एफ 22 93 )ने शहापूरकडे जात असताना धाबे पिंपरी शिवारात समोर हार्वेस्टर (क्र एच आर 05 ए ई 46 99 ) जात होते. हार्वेस्टरच्या मागील बाजूस काटेरी तार असलेले रिपर लावलेले होते. हार्वेस्टरच्या समोरून आलेल्या ट्रकने फोकस मोठा केल्याने हार्वेस्टर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागील मालवाहू टाटा गाडी रिपरला जाऊन धडकली. या अपघातात खुशाल महाजन (वय 21) आणि राजू महाजन (वय 26) हे जागीच ठार झाले. बाळू सोनवणे आणि चालक मयूर राखुंडे जखमी झाले. दोन्ही गंभीर जखमींना बर्हाणपुर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे करत आहेत.