भुसावळातील ट्रामा सेंटर व ग्रामीण रूग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करा; आरोग्य मंत्र्यांना निवेदन

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या संकटात सर्व मदार नगरपालिकेच्या रूग्णालयावर आल्याने शहरातील ट्रामा सेंटर व ग्रामीण रूग्णालय हे सर्व सुविधांनी परिपुर्ण सज्जतेने सुरू करावे अशी मागणी जि.प.सदस्य रविंद्र पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ शहर व ग्रामीणची लोकसंख्या सुमारे पावणेतीन लाखाच्‍या जवळपास आहे. भुसावळात सर्वात मोठे रेल्वे स्टेशन, दोन ऑर्डनन्स फॅक्टरी, ‘अ’ दर्जाची नगरपरिषद आहे. कोणत्याही आजाराने किंवा अपघातात रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यास जळगाव सिव्हिल रुग्णालय येथे हलवावे लागते. कोरोना संशयित तपासणी, गरोदर महिला,इतर आजाराचे रुग्ण, अपघाती रुग्ण असा खूप मोठा भार नगरपरिषदेच्‍या रुग्णालयावर पडत आहे. भुसावळ येथेच ट्रॉमा सेंटर तथा उपजिल्हा रुग्णालय नुकतेच सुरू झाले आहे. परंतु त्या ठिकाणी फक्त सध्या मॅटर्निटी वॉर्ड सुरू झाला आहे. ना.टोपे यांनी लवकरात लवकर भुसावळ येथील ट्रॉमा सेंटर संपूर्ण सज्जतेने सुरू करण्यासाठी नियोजित डॉक्टर, स्टाफ व मशिनरीची उपलब्धता करून द्यावी. जेणेकरून इतर आजाराचे रुग्ण, अपघाती रुग्ण यांना जळगावला हलवण्याची गरज न पडता भुसावळ येथेच लवकर उपचार मिळून जीव वाचतील आणि नगरपरिषदेच्या रुग्णालयामध्ये कोरोनासाठी संपूर्णपणे समर्पित कार्य होईल. जेणेकरून कोरोना संकट काळात भुसावळकरांना जळगावला जाण्याचा त्रास वाचू शकेल असेही निवेदनात म्‍हटले आहे.

Protected Content