भुसावळ प्रतिनिधी । जळगावच्या सिव्हील हॉस्पीटलप्रमाणेच भुसावळच्या कोविड केअर सेंटरमध्ये अनेक गैरसोयी असून याबाबत कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी उपमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
याबाबत वृत्त असे की, जळगावच्या सिव्हील हॉस्पीटलमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून याबाबत जनसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सिव्हील प्रमाणे भुसावळ येथील कोविड केअर सेंटरमध्येही अतिशय भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, भुसावळातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतीगृहात सध्या विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला असून येथे संशयित रूग्णांना क्वॉरंटाईन केले जाते. येथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. अगदी येथे पाणी देखील बाहेर बसलेल्या विक्रेत्याकडून घ्यावे लागते. तर रूग्णांना आपल्या घरून डबा आणावा लागतो. येथे फिजीकल डिस्टन्सींगचे कोणतेही नियम पाळण्यात येत नाहीत. काही दिवसांपूर्वी क्वॉरंटाईन केलेल्या एका तरूणाने आपल्या मित्रांसोबत येथे चक्क ओली पार्टी केली असून यात त्या तरूणासह त्याच्या मित्रांना कोरोनाची बाधा झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मध्यंतरी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दौरा झाला असतांना प्रशासनाने आपण काही तरी करत असल्याचा देखावा केला असला तरी आता स्थिती आधीप्रमाणेच पूर्वपदावर आली आहे. भुसावळात पोलीस प्रशासन चांगले काम करत असले तरी नगरपालिकेचे त्यांना सहकार्य मिळत नाही. स्थानिक सत्ताधारी आरोग्य यंत्रणांना आपल्या तालावर नाचवत असल्याचे हा प्रकार घडत असून उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा करून ही परस्थिती जाणून घेत संबंधीतांवर कारवाई करण्याची अपेक्षा यात व्यक्त करण्यात आली आहे.