जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पिंप्री ते पिंपळगाव दरम्यान महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरुवार २२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पहूर पोलीस ठाण्यात दुचाकीधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सांडू हुसेन शेख (वय-५५) रा. सावळतबारा ता. सोयगाव जि.औरंगाबाद हे त्यांचा मुलगा मोसिन शेख याच्यासोबत गुरूवार २२ डिसेंबर रेाजी सकाळी ११ वाजता दुचाकी (एमएच २० एफडी २८३०) ने फत्तेपूरकडून सोयगावकडे जात असताना पिंप्री ते पिंपळगाव महामार्गावरील निवांत ढाब्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी (एमएच १९ सीएल ६१६०) याने जोरदार समोरासमोर जोरदार धडक दिली. या धडकेत सांडू हुसेन शेख (वय-५५) रा. सावळतबारा ता.सोयगाव जि. औरंगाबाद आणि समोरील दुचाकीस्वार मनोहर पांडुरंग दांडगे रा. दाभा ता.सोयगाव जि. औरंगाबाद या दोघांचा मृत्यू झाला. यासंदर्भात पहूर पोलीस ठाण्यात शेख वसीम शेख गयास रा. सुभाष पुरा, फत्तेपूर ता. जामनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी रक मनोहर पांडुरंग दांडगे यांच्या विरोधात दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहे.