मुंबई (वृत्तसंस्था) भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांनी आज राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेसमोर (एनआयए) आत्मसमर्पण केले आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र ‘मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेली नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही’, असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. तेलतुंबडे, गौतम नवलखा आणि इतर अनेकजणांवर माओवाद्यांचा संबंध असल्याचा आणि सरकार उलथवण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा (यूएपीए) च्या कडक तरतुदीखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अलीकडेच भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला होता. तसेच सुप्रीम कोर्टाने देखील १७ मार्चला त्यांच्या याचिका फेटाळल्या आणि तीन आठवड्यात आत्मसमर्पण करण्यास कोर्टाने सांगितले होते. त्यानुसार आज १४ एप्रिल रोजी त्यांची मुदत संपल्यानंतर तेलतुंबडे यांनी आत्मसमर्पण केल्याचे त्यांचे वकील तेलतुंबडे यांचे वकील मिहीर देसाई यांनी सांगितले. दरम्यान, या कारवाई बाबत अनेक विचारवंत आणि राजकीय नेत्यांनी निषेध नोंदवला आहे.