अमळनेर, प्रतिनिधी | येथील रेल्वे स्थानकावरील भिंतीवर महापुरुषांचा भित्तिचित्रे रंगविण्यात आले आहे. मात्र सदर ठिकाणी थुंकणे, लाथ मारणे आदी घटना घडत आहे. यामुळे भित्तिचित्रे योग्य ठिकाणी लावुन महापुरुषांचा अवमान रोखण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून रेल्वे स्थानक सुशोभिकरनासाठी अनेक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्यात त्यांचा हेतू अगदी शुद्ध असला तरी काही ठिकाणी जसे की, अमळनेर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वर रेल्वेच्या भिंतीवर चित्र रेखाटण्यात आलेले आहे. त्यात वेगवेगळे नकाशे आकृत्या रेखाटल्या जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा फोटो रेखाटण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी काही विकृत लोकांनी गुटखा खाऊन थुंकणे, भिंतीला लाथ लावून उभे राहणे असे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अमळनेरातील शिवप्रेमी बांधवांनी हे भित्तिचित्रे आहे त्या ठिकानाहून काढून पुनश्च योग्य त्या यथोचित ठिकाणी लावावी आशा आशयाचे निवेदन अमळनेर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक यांना दिले आहेत. या निवेदनावर माजी सैनिक राजेंद्र यादव, रमेश काळे, शंकर चव्हाण, संतोष शिंदे, पंकज उबाळे, महावीर मोरे, शुभम पवार, पत्रकार सचिन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते इकबाल पठाण, मुकेश परदेशी, श्रीकृष्ण मित्र मंडळाचे सदस्य जितेंद्र हगवणे, प्रशांत गायकवाड आदींच्या सह्या आहेत.