नवी दिल्ली: वृत्तसंस्था । आता भारत स्वस्त कोरोना लस बनवण्याच्या मार्गावर आघाडी घेत असल्याचे दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या मुख्य न्यूरोसाइंसेज डॉ. एम. व्ही. पद्मा श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
भारत जगातील अशा देशांपैकी एक आहे ज्यांनी कोविड-१९ महासाथ पसरवणाऱ्या नॉव्हेल कोरोना विषाणूला वेगळे करण्यात यश प्राप्त केले आहे.
डॉ. एम. व्ही. पद्मा श्रीवास्तव या गेल्याच आठवड्यात करण्यात आलेल्या कोव्हॅक्सीन या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत सहभागी झाल्या होत्या. कोव्हॅक्सीन ही भारतातील देशी लस आहे. ही लस भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनेच्या (ICMR) मदतीने औषध निर्मिती कंपनी भारत बायोटेक तयार करत आहे. मी गेल्या गुरुवारी दिल्लीतील एम्समध्ये कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता. पुढील डोस २८ दिवसांनंतर दिला जाणार आहे, असे डॉ. श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
५५ वर्षीय डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले की, त्यांनी या लशीचा डोस घेतल्यानंतर आतापर्यंत कोणताही साइड इफेक्ट जाणवला नाही. खरेतर, नुकत्याच पार पडलेल्या चाचणीत सहभागी झालेल्या एका स्वयंसेवकाने साइड इफेक्ट झाल्याचे म्हटले होते. एम्सची कोव्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत १,००० हून अधिक लोकांची लस टोचण्यासाठी नोंदणी करण्याची योजना आहे. आतापर्यंत ४० ते ५० स्वयंसेवकांनी नोंदणी केली असून त्यांना पहिला डोस देण्यात आलेला आहे.