भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा (व्हिडीओ)

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ईव्हीएमच्या माध्यमातून गैरप्रकार होत असून ते लोकशाही विरोधी असून त्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

प्रोटेस्ट मार्चला काढू न देता अडथळा आणल्याच्या निषेधार्थ वामन मेश्राम यांनी राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी देशभरातील ५६७ जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे प्रदर्शन करण्यात आले. भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सद्यस्थितीत देशात लोकशाही नावाला शिल्लक उरलेली आहे. संविधान पूर्णपणे धोक्यात आलेले आहे. मुलभूत अधिकारांवरही गदा आलेली आहे. भाजपच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशाचा कारभार चालवत आहे. हिंदू-मुस्लिमांमध्ये दुही करुन सत्तेची पोळी शेकत आहेत. त्यांना वेळीच रोखले नाही तर लोकशाही व संविधान संपल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला.

संघ भाजपाचा ओ.बी.सी.जनगणनेस सरकारचा असलेला विरोध, अल्पसंख्यांकाना मिळत असलेली दुय्यम दर्जाची वागणूक, देशभरात दलित-अल्पसंख्यांकावर होत असलेले अमानुष अत्याचार,मुलभूत अधिकारावर आणली जाणारी गदा आदी तेरा मुद्यांवर घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामध्ये भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

Protected Content