नवी दिल्ली वृत्तसंस्था – एका बाजुला चर्चा सुरू असतानाच भारत चीनच्या सीमेवर दोन्ही देशांचं लष्कर आमने-सामने आल्याचं चित्रं आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनकडून दगाबाजीचा धोका असल्यानं भारतीय सेनेकडून आता १५५ मिमी होवित्झर तोफा तैनात करण्यात आल्यात. रशियात मॉस्कोमध्ये गुरुवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या बैठकीत पाच मुद्यांवर दोन्ही पक्षांची सहमती झाल्याचं सांगण्यात आलं होतं. दोन्ही देशांकडून मोकळेपणाने चर्चा करण्याची आणि चर्चेतून मार्ग काढण्यासंबंधी चर्चाही झाली होती.
पॅन्गाँग सरोवराजवळ चिनी सेनेकडून आपली ताकद वाढवल्याचं लक्षात आल्यानंतर भारतीय लष्करानं सीमेवर बोफोर्स तोफा तैनात करण्याचं महत्त्वाचं पाऊल उचललं वास्तविक नियंत्रण रेषेवर सध्या जवळपास ४० हजार भारतीय जवान तैनात आहेत. वायुसेनाही सज्ज आहे त्यातच होवित्झर तोफा सीमेवर पाठवण्यात येत आहेत.
दरम्यान, भारतीय जवानांनी फिंगर ४ पर्यंत आपलं वर्चस्व कायम केलंय. उंचीवरील जागा ताब्यात घेतल्यानं या भागात भारतीय जवानांचा दबदबा दिसून येतोय. त्यामुळे चीनची घालमेल वाढलीय. चीनकडून अगोदरच जवान, गाड्या आणि हत्यारं तैनात करण्यात आलेत.