भारत – चीन वाद सोडविण्यासाठी मोदी , जिनपिंग सक्षम — पुतीन

 

सेंट पीटर्सबर्ग : वृत्तसंस्था । ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे जबाबदार नेते आहेत. भारत आणि चीन यांच्यातील समस्या सोडविण्यासाठी ते सक्षम आहेत,’ असे प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले.

 

या दोन्ही देशांमधील वादामध्ये या विभागाबाहेरील कोणत्या देशाने हस्तक्षेप करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

 

पुतिन यांनी भारतासह अमेरिका व युरोपीय देशांमधील माध्यमांच्या  संपादकांशी संवाद साधला, त्यामध्ये विविध मुद्द्यांवर भाष्य केले. चीनच्या वाढत्या कारवायांमुळे अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा ‘क्वाड’ हा गट आकाराला आला आहे. रशियाने जाहीरपणे या गटाला विरोध केला आहे. या गटामध्ये भारताचा सहभाग आहे, त्यावर पुतीन म्हणाले, ‘कोणत्या देशाने कोणत्या गटामध्ये सहभागी व्हावे किंवा कोणत्या देशाबरोबर कसे संबंध विकसित करावेत, याविषयी सांगता येत नाही. मात्र, कोणत्याही देशांमधील मैत्री कोणाबरोबरील शत्रुत्व डोळ्यासमोर ठेऊन असू नये.’

 

रशिया आणि भारत हे मित्रदेश असून, रशियाचे चीनबरोबरील संबंधही दृढ आहेत. मात्र, यामध्ये कोणताही विरोधाभास नसल्याचे सांगत पुतिन यांनी भारत-चीन यांच्यातील वादावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये काही समस्या आहे. मात्र, दोन शेजारी देशांमध्ये कायमच अशा पद्धतीचे वाद होत असतात. मात्र, मोदी आणि जिनपिंग या दोन्ही नेत्यांच्या विचारांची पद्धत मला माहीत आहे. दोन्ही नेते खूप जबाबदार असून, परस्परांना खूप आदराने वागवतात. त्यामुळे, ते या समस्यांच्या तोडग्यापर्यंत येतील, असा विश्वास मला वाटतो. मात्र, या विभागाबाहेरील कोणत्या देशाने या समस्येमध्ये हस्तक्षेप करायला नको.’

 

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध विश्वासावर आधारित आहेत. या संबंधांमध्ये अर्थव्यवस्था, ऊर्जा आणि उच्चतंत्रज्ञानाचा समावेश आहे. अद्ययावत शस्त्रास्त्रे विकसित करणे आणि उत्पादन करण्याच्या दृष्टीने रशिया केवळ भारताबरोबर भागीदारी करत आहे. मात्र, दोन्ही देशांमधील संबंध केवळ या क्षेत्रापुरते मर्यादित नाही, तर बहुस्तरीय आहे, असेही त्यांनी नमूद केले. अमेरिका चलनाचा वापर राजकीय अस्त्रासारखा करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

 

‘रशियन बनावटीच्या स्पुटनिक-व्ही लशींचे उत्पादन करण्यासाठी भारतीय कंपन्या तयार आहेत. लशींचे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यासाठी तयार असणारा रशिया हा एकमेव देश आहे,’ असा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. आतापर्यंत ६६ देशांना लशी विकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भारतामध्ये डॉ. रेड्डीज यांना एप्रिलमध्ये स्पुटनिक-व्ही लशींच्या उत्पादनासाठी परवानगी मिळाली असून, आता सीरमलाही परवानगी मिळाली आहे. याशिवाय, पॅनाशिया बायोटेक या कंपनीनेही भारतामध्ये उत्पादन सुरू केले आहेत, या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी हे विधान केले आहे.

 

Protected Content