इस्लामाबाद : वृत्तसंस्था । इम्रान खान यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक फिरदौस आशिक अवान यांनी पाकिस्तानमध्ये भारतविरोधी भावनांवर केलेल्या भाष्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळतो भारताला विरोध करण्यावरच आमचं गुजराण होतं. त्यामुळेच सर्व राजकीय नेते या मुद्द्याबद्दल बोलत असतात, असंही अवान म्हणाल्या आहेत.
पाकिस्तानमधील राजकारण हे भारताला विरोध करण्याच्या अवतीभोवतीच फिरते असं म्हटलं जातं. पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्र्यानेच आता या गोष्टीवर शिक्कामोर्बत करणारं वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या माहिती आणि संस्कृती विषयाच्या विशेष सहाय्यक असणाऱ्या अवान याना पाकिस्तानमधील चर्चेमध्ये अँकरने आपल्याकडील राजकारण्यांनी गद्दारी, भारत, मोदीसारख्या विषयांबद्दलची वक्तव्य करणं हे अगदी सामन्य झालं आहे असं नाही का तुम्हाला वाटतं?, असा प्रश्न विचारला.
“आपल्या देशामध्ये भारतविरोधी भावनांसंदर्भातील वक्तव्य जास्त चर्चेत असतात. जे सर्वाधिक चर्चेत असतं विकलं जातं लोकं त्याचाच वापर करतात. हे केवळ सरकारच नाही तर सगळेच करतात,” असं उत्तर दिलं. विरोधी पक्षाने तर मोदींच्या नावाखाली तर अशा गोष्टी विकल्या आहेत की त्या ऐकून हसू येईल असा टोलाही अवान यांनी लगावला.
अवान या इम्रान खान यांची सरकार सत्तेत येण्याआधी इम्रान यांच्याच मुव्हमेंट फॉर चेंज मोहिमेत सक्रिय होत्या. याच मोहिमेदरम्यान इम्रान आणि त्यांच्या समर्थकांनी इस्लामाबादमध्ये महिनाभर आंदोलन केलं होतं. अवान या पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या सरकारमध्ये मंत्रीही होत्या. एप्रिल २०१९ मध्ये इम्रान खान यांनी अवान यांना आपल्या मंत्रीमंडळामध्ये सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालयामध्ये विशेष अधिकारी म्हणून नियुक्त केलं.
विशेष म्हणजे अवान यांनी केलेल्या आरोपाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पंतप्रधान इम्रान खानच आहेत. असा एकही दिवस जात नाही जेव्हा इम्रान खान हे भारताविरोधात वक्तव्य करत नाहीत. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त झालेल्या भाषणामध्येही त्यांनी अशीच काही वक्तव्य केली होती. काश्मीर मुद्द्यावर अनेकदा इम्रान खान यांचे पितळ उघडं पडलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या मंचावर देण्यात आलेल्या बहुमुल्य वेळेतही त्यांनी भारतावर टीका करण्यातच धन्यता मानली.