नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतात शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त विद्यापीठांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. जागतिक गुंतवणूक परिषदेत मोदी बोलत होते. भारत आणि कॅनडामध्ये व्यापार विषयक आदान-प्रदान वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, ‘लोकशाहीमध्ये राजकीय स्थैर्य आवश्यक असते. देशात सध्या गुंतवणुकीला पोषक वातावरण आहे. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांना देशामध्ये गुंतवणुकीस वाव आहे. खासगी क्षेत्रामध्ये नव्या संधी आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये चांगला भागीदार हवा असेल, तर तो भागीदार भारत आहे. उत्तम प्रतीच्या पायाभूत सुविधा आहेत. जागतिक स्तरावर भारताची उत्तम प्रतिमा आहे.’
मोदी पुढे म्हणाले, ‘कोरोनाच्या संकटकाळात दुर्बल घटकांना विविध पॅकेज भारताकडून देण्यात आली. रचनात्मक सुधारणांसाठीही विविध गोष्टी करण्यात आल्या. विविध क्षेत्रातील उत्पादकता वाढण्यास मदतच झाली. रस्ते, रेल्वेमार्ग, विमानतळे, महामार्ग, ऊर्जास्रोत आदी गोष्टी भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
येल, ऑक्सफर्ड, स्टॅनफोर्ड यांसारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस देशात सुरू व्हावेत यासाठी मोदी सरकार कायदा आणण्याच्या विचारात आहे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त देण्यात आले आहे. विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पोखरियाल यांनी म्हटले आहे.