नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकार तसंच राज्यसरकारकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतू तरी देखील भारतातील रुग्णांची संख्या 147 पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, आतापर्यंत देशभरात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सरकारकडून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालंय, मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच देशातील करोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजपा महिन्याभरात कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाही. सर्व राज्यांमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसंच यासंदर्भातील परिपत्रकही काढण्यात आले असल्याची माहिती, जे.पी. नड्डा यांनी दिली. तर आतापर्यंत आंध्र प्रदेशनमध्ये 1, दिल्लीमध्ये 10, हरियाणामध्ये 16, कर्नाटकात 11, केरळमध्ये 27, महाराष्ट्रात 42, ओडिशामध्ये 1, पंजाबमध्ये एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.