भारताच्या ४३ हजार चौरस किमीपेक्षा अधिक भागावर चीनचे अतिक्रमण

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । चीनने १९६२ पासून लडाखमधील ३८ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र बळकावलं आहे.पाकिस्तानने भारताची ५१८० हजार चौरस किमी जमीन बळकावत चीनला दिलीय. अशाप्रकारे चीनने ४३ हजार चौरस किमीपेक्षा अधिक भागावर अनधिकृतपणे अतिक्रमण केलंय,” असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

 

अनेक महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अखेर तोडगा निघाला आहे. अनेक दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरु होती. मात्र, दोन्ही देश आपल्या भूमिकांवर ठाम होते. त्यामुळे सीमेवरील तणावावर मार्ग निघत नव्हता. अखेर दोन्ही देशांनी सीमेवर ‘जैसे थी’ स्थिती ठेवत आपआपलं सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत दोन्ही सैन्यात करारही झाला. याचा व्हिडीओ देखील प्रकाशित करण्यात आलाय

 

सैन्याकडून प्रकाशित करण्यात आलेल्या व्हिडीओत दोन्ही बाजूचे सैन्य आपले रणगाडे मागे घेताना दिसत आहेत.  भारत आणि चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करत करारावर स्वाक्षरी केल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सीमेवरील या घडामोडींची माहिती संसदेत दिली.

 

 

राजनाथ सिंह म्हणाले, “चीनकडून मागील वर्षी एप्रिल, मे दरम्यान पूर्व लडाखच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि सैन्य गोळा करण्यात आलं होतं. या भागात चीनने आपलं सैन्य तैनात केलं. त्याला भारताने देखील उत्तर दिलं होतं. चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना संसदेने देखील अभिवादन केलं होतं. मी आज संसदेला त्याबाबत झालेल्या घडामोडींची माहिती देऊ इच्छितो. मागील वर्षी सप्टेंबरपासून दोन्ही देशांनी सैन्य आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरु आहे. सध्या दोन्ही देश शांततापूर्ण पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.”

 

“चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर देखील अनेक चौरस किमी भागाला आपलं असल्याचा दावा करतो. भारताने चीनच्या या अनधिकृत दाव्यांना कधीही मान्य केलेलं नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

 

राजनाथ सिंह म्हणाले, “मागीलवर्षी चीनने केलेल्या कृतीमुळे सीमेवरील शांतता भंग झाली होती. त्यामुळे चीन आणि भारताच्या संबंधांवरही परिणाम झाला. मी स्वतः सप्टेंबरमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांनी देखील आपल्या समकक्षांसोबत बैठका केल्यात.”

 

Protected Content