मुंबई-भाजप हा पक्ष अजगर किंवा मगरीप्रमाणे आहे. तो सोबतींनाच गिळत सुटतो. हे शिंदे गटाला आता हळुहळु कळायला लागले आहे, असा खोचक टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
खासदार संजय राऊत मीडियाशी बोलत होते. भाजपानं त्यांचा मूळ स्वभाव, मूळ भूमिका सोडलेली नाही. ती कायम आहे. कीर्तीकरांसारखा आमचा सहकारी तिथे जाऊनही सुखी नाही, म्हणजे काल मी म्हणालो तसं भाजपानं हा कोंबड्यांचा खुराडा पाळलाय. आता त्यातली एकेक कोंबडी त्यांनी कापायला सुरुवात केली आहे, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.
“भाजपा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी सावत्रपणाची वागणूक करते. महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवण्याच्या भूमिकेतून भाजपा काम करत होती. म्हणून आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो. भाजपा एक अजगर किंवा मगर आहे. आत्तापर्यंत जे जे त्यांच्याबरोबर गेले त्यांना त्यांनी खाऊन टाकलं. फक्त आम्ही सोडून. आता शिंदे गटाला अनुभव येतोय. त्यांना हळूहळू कळेल की उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य होती”, असं संजय राऊत म्हणाले.