भाजप प्रवेशामुळेच चित्रा वाघ यांचे पती मोकळे — सचिन सावंत

 

 

मुंबई : वृत्तसंस्था ।“किशोर वाघांवर १२ फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला खुली चौकशी २०१६ ला भाजपाने सुरू केली. ताईंनी भाजपात प्रवेश केला नसता तर फडणवीस सरकारने तेव्हाच गुन्हा दाखल केला असता. राजकीय दिरंगाई व कोरोनामुळे वेळ लागला. बेहिशेबी मालमत्ता दिसली आहे.” असं सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. त्यांनी ट्विट सोबत एफआयआर कॉपी जोडली आहे.

 

राज्यात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपा या मुद्यावर आक्रमक झाली आहे. महाविकासाघाडी सरकारला घेरण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ही दमबाजी असुन, किशोर वाघ यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा राजकीय सूड भावनेचा प्रकार असल्याची टीका भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. यावर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकासआघडी सरकारवर निशाणा साधला आहे. “चित्राताई वाघ या लढवय्या नेत्या आहेत. त्यांच्या पतीवर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा राजकीय सूड भावनेचा प्रकार! संपूर्ण भाजपा चित्रा ताईंच्या पाठीशी सक्षमपणे उभा आहे.”  असं ते म्हणाले

 

वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे परळच्या महात्मा गांधी रुग्णालयात मेडिकल रेकॉर्डर म्हणून सेवेत होते. १९९७ मध्ये तक्रारदार व्यक्तीच्या भावाचा स्पाइनल कॉडच्या शस्त्रक्रियेदरम्यान गांधी रुग्णालयात मृत्यू झाला होता. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाला होता. त्यामुळे तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली होती. त्यानंतर तक्रारदाराने राष्ट्रीय ग्राहक निवारण कक्षाकडेही तक्रार केली होती. वैद्यकीय नोंदी ठेवणारे किशोर वाघ यांनी १५ लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि तक्रारदाराच्या भावाच्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून अर्ज करण्याची सूचना तक्रारादारास केली होती. त्यासाठी वाघ यांनी चार लाखांची लाचही मागितली होती, असा आरोप तक्रारदाराने केला होता. तशी तक्रारही त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

 

“पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकासआघाडी सरकारवर टीका केल्यानं आणि मी सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच माझे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी करायची होती, तेव्हा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या पतीला घरी येऊन नोटीस दिली. पण आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तर एसीबीला त्यांना कळवावेसे वाटले नाही का? एसीबीकडे माणसे उरली नाहीत का?,” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

 

पूजा चव्हाण प्रकरणावरून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. संजय राठोड बलात्कारी असून, एका बलात्काऱ्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्याभिचाराचं उदात्तीकरण सुरू आहे. पण, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर नसते. शिवसेनेचे पक्षप्रमुख असते, तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं,” असं म्हणत वाघ यांनी राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Protected Content