लखनऊ । भाजपच्या एका नेत्याकडून आपल्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे. ते येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भाजप नेत्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कन्नौजमध्ये त्याच नेत्याने एका तरुणाला पाठवून कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला. अखिलेश यादव यांचे शनिवारी कन्नौज येथील एका कार्यक्रमात भाषण सुरू होते. ते मोदी सरकारच्या कारभारावर टीका करीत होते. याचवेळी एका तरुणाने मंचावर धाव घेतली आणि आपण सत्तेत आलात तर काय करणार, असा जाब विचारला. पोलिसांदेखत हा प्रकार घडल्याने अखिलेश यांनी बंदोबस्तावरील पोलिसांना फैलावर घेतले होते. या तरुणाच्या घुसखोरीबाबत अखिलेश यांनी रविवारी पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. भाजप नेत्याने मला पाठवलेला धमकीचा मेजेस मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवला आहे, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. मात्र त्यांनी भाजप नेत्याचे नाव उघड केले नाही.