जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या प्रदेश सदस्या प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांना दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपण प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तूळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
यापूर्वीच प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम करीत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची साथ देत त्यांच्या नेतृवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता पाचोरा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या डॉ.अस्मिता पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे. त्या पुनश्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वगृही परत जातात की आमदार किशोर पाटील यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेची कास धरतात हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.
डॉ.अस्मिता पाटील या पाचोरा मतदार संघातून आमदारकीच्या तिकिटासाठी तर लोकसभेच्या जळगाव मतदार संघातून इच्छुक होत्या, मात्र पक्षांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्या नाराज होत्या. त्याच्या सोबत अजून कोणकोण पक्ष त्याग करण्याच्या तयारीत आहे याची माहिती विचारली असता योग्यवेळी योग्य निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील म्हणाल्या.