नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्ली पोलिसांना खडे बोल सुनावणारे न्या. एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यावरुन आता काँग्रेसने भाजपाला विरोध केल्यास मारले जाल किंवा तुरुंगात जाल असे टिकास्त्र सोडले आहे.
दिल्लीमधील हिंसाचार प्रकरणी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान चिथावणीखोर विधाने करणार्या भाजपाच्या नेत्यांविरोधात अद्याप गुन्हा का नोंदवला नाही, असा सवाल करत दिल्ली पोलिसांना फैलावर घेणार्या न्या. एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. यावरुन आता काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन न्या. मुरलीधर बातमीची लिंक शेअर करत भाजपाला टोला लगावला आहे. भाजपाशी असहमत असाल तर तुम्हाला ठार केलं जाईल, बदली केली जाईल, बरखास्त केलं जाईल किंवा अटक केली जाईल. इथे न्याय व्यवस्थेलाही सोडले नाही. न्याय नकारला नाही तर उदध्वस्त करण्यात आला आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे.