भाजपने एकनाथराव खडसे यांची राष्ट्रीय कार्यकारणीतील संधी डावलली

 

मुंबई, वृत्तसंस्था । भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज आपल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली.यात महाराष्ट्रातील पंकजा मुंडे व विनोद तावडे सचिव पदी नियुक्ती करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना राष्ट्रीय कार्यकारणीत संधी न देता पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या नवीन कार्यकारणीत राज्या-राज्यातील नाराज नेत्यांना सामावून घेतल्याचं दिसत आहे. यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे व तावडे यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, एकनाथराव खडसे यांना मागील विधानसभा निवडणुकीत तिकीटही नाकारून त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आले. मात्र, त्यांचा पराभव झाला.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार हिना गावित यांना देखील राष्ट्रीय कार्यकारणीत राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, एकनाथराव खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. या आरोपणामुळेच त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी नाकारण्यात आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Protected Content