भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

 

सोलापूर : वृत्तसंस्था । माजी आमदार कल्याणराव काळे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचे संकेत मिळाले असून या माध्यमातून भाजपला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे.

कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील मोठं नाव आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमाध्ये गेले होते. काळे हे भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सीताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापकही आहेत. श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांच्यामागे मोठा जनाधार आहे.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार सरकोली येथे गेले होते. त्यांच्या सोबत माजी आमदार कल्याणराव काळे हे देखील उपस्थित होते. कल्याणराव काळे यांनी आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे वक्तव्य या कार्यक्रमात केल्याने ते लवकरच हातावर घड्याळ बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content