बारामती (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागण झालेले कोरोना आहे, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी विखारी भाषेत टीका केली होती. पडळकर यांच्या टीकेमुळे आज राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पडळकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलनं करत आहे. बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनला गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती. ‘जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या मांडणार’, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. अखेर पोलिसांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांच्यावर 505(2)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.