जळगाव प्रतिनिधी । शहरातील बॉम्बे बेकरीजवळील मलीक नगरात दोघांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाच्या वडीलांना चाकूने गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी २७ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता घडली होती. उपचार घेतल्यानंतर तरूणाच्या फिर्यादीवरून चार जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गाजवळील बॉम्बे बेकरीजवळील मलीक नगरात राजीक अहमद गंभीर खान आणि शेख कासीम शेख कलीम दोन्ही रा. दत्त नगर जळगाव यांच्यात रविवार २७ डिसेंबर रोजी रात्री १० ते १०.३० वाजेच्या सुमारास आपसात भांडण सुरू होते. दोघांचे भांडण सुरू असल्याने फिर्यादी शेख इम्रान शेख जहीर (वय-२६) रा. मलीक नगर यांचे वडील शेख जहीर हे भांडण मिटविण्यासाठी गेल्याचा राग आल्याने संशयित आरोपी राजीक अहमद गंभीर खान, जुबेर आलम गंभीर दोन्ही रा. दत्त नगर आणि शेख कासीम शेख कलीम, शेख कलीम शेख बाबू रा. जोशी वाडा, मित्तल स्कूल जळगाव या चौघांनी फिर्यादी शेख इम्रान शेख जाहीर या तरूणासह त्याच्या आईवडीलांना बेदम मारहाण केली. तर यातील राजीक अहमद याने शेख जाहीर यांच्या हातावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे. जखमीस खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.