नवी दिल्ली : वृत्तसंस्था । “येणाऱ्या काळात मुलांना कोरोनापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. बालरोग सेवा आणि लस उपचार प्रोटोकॉल आधीच तयार करणे आवश्यक आहे. भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे आवश्यक आहे” अशी टीका आज राहुल गांधी यांनी केली
देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे बोलल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मुलांना वाचविण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत सर्व तयारी अगोदरच पूर्ण करावी लागेल, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. कोरोना काळात विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीकासत्र सुरु आहे. राहुल गांधी सतत मोदी सरकारवर शाब्दीक हल्ले करत आहेत.
यापुर्वी देखील राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. ‘पीएमकेअरचे व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान यांच्यात अनेक समानता आहेत. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात – हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात – दोघांनाही सापडणे कठीण आहे.’, असे राहुल गांधी म्हणाले होते.
देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. काही दिवसांपासून देशात रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे. मात्र, मृत्यू्चे प्रमाण अद्याप चिंतेचा विषय आहे. भारतात, गेल्या २४ तासात संक्रमणामुळे ४३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात मृत्यू झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. आज आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात कोरोनाचे २,६३,५३३ नवीन रुग्ण आढळले आहेत.