जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ममुराबाद ते जळगाव रस्त्यावरील कृषि महाविद्यालयाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने रस्त्यावर दुचाकीजवळ उभा असलेल्या तरूणाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. याबाबत शनिवार २५ जून रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहम्मद फारूख अब्दूल खाटीक (वय-३२) रा. उस्मानिया पार्क जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २१ जून रोजी मोहम्मद खाटीक हा त्याच्या मित्रासोबत दुचाकीने किनगाव येथे कामानिमित्त गेले होते. काम आटोपून परतत असतांना रात्री १२ वाजेच्या सुमारास ममुराबाद ते जळगाव रस्त्यावरील कृषी महाविद्यालयाजवळ त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले होते. त्यावेळी मोहम्मद व त्याचा मित्र रोडवर उभे असतांना ममुराबाद कडून येणारी रिक्षा (एमएच १९ व्ही ९३२६) ने जोरदार धडक दिली. या अपघातात मोहम्मदला जबर दुखापत झाली. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. चार दिवस उपचार घेतल्यानंतर मोहम्मद खाटीक याने शनीवारी २५ जून रोजी दुपारी २ वाजता जळगााव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर शिंदे करीत आहे.