सैन्य भरतीचे स्वप्न दाखवून लाखोंचा गंडा

 

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील तरुणांसह राज्यातील सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लाखोंची फसवणूक करून फरार झालेला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सहाय्यक उपनिरीक्षक असलेल्या जवानास पाचोरा पोलिसांनी नाशिक येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीस पाच दिवसांचा पोलिस कोठडी मिळाली आहे.

पोलिसांनी अटक केलेला आरोपी रमेश ईश्वर बागुल (वय- ५०) हा नगरदेवळा ता. पाचोरा येथील मूळ रहिवासी आहे. तो हल्ली विलासपूर (छत्तीसगढ) येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहे. त्याने नगरदेवळा येथे सुट्टीवर आल्यानंतर सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना संपर्क करत सैन्य दलात नोकरी लावण्याचे आश्वासन देत नगरदेवळा, धुळे, नाशिक, अहमदनगर आदी ठिकाणच्या सुमारे २२ तरुणांकडून सुमारे ६० लाख रुपयांची माया गोळा केले होती. काही दिवसांच्या प्रतिक्षेनंतही नोकरी लागत नसल्याचे लक्षात आल्याने नगरदेवळा येथील रवींद्र पाटील या तरुणाने पाचोरा पोलिसात गुरन.३६८/२०२० आयपीसी कलम ४२०,३४प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास पाटील, नाईक राहुल सोनवणे, विश्वास देशमुख, विनोद बेलदार, किरण पाटील, तांत्रिक शाखेचे वारुळे यांच्या मदतीने आरोपीला नागपूर व नाशिक येथे तपास करत केवळ नावा शिवाय इतर कुठलिही माहिती नसतांना सलग पाच दिवस कठोर परिश्रम घेत आरोपीला नाशिक येथुन अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून या फसवणुकीत कोणा कोणाचा सहभाग आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत. दरम्यान, सुशील मगरे यास जामनेर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी त्यास १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . यावेळी सरकारी पक्षातर्फे अॅड अनिल सारस्वत यांनी युक्तिवाद केला.

Protected Content