भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी बकरी ईदच्या दिवशी आषाढी एकादशी येत असल्याने या रोजी कोणत्याही प्रकारची कुर्बानी देण्यात येणार नसल्याचा निर्णय येथील मुस्लीम बांधवांनी घेतला असून आज शांतता समितीच्या बैठकीत याला घोषीत करण्यात आले.
आगामी आषाढी एकादशी तसेच बकरी ईद सणाच्या अनुषंगाने तहसिल कार्यालय, भडगांव येथे तहसिलदार यांचे दालनात तहसिलदार मुकेश हिवाळे यांचे अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर मिटिंग कामी तहसिलदार मुकेश हिवाळे, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. श्री. निर्मल असे तसेच शांतता कमिटी मधिल सर्व धर्मिय सदस्यीय पदाधिकारी, पत्रकांर बांधव हजर होते.
याप्रसंगी आगामी आषाढी एकादशी व बकरी ईद सणाच्या अनुषंगाने विजय देशपांडे, गणेश परदेशी, जाकिर हाजी कुरेशी, सुनिल पाटील, ईरफान अली सैय्यद, डॉ. निलेश पाटील, शिवदास महाजन यांनी त्यांचे मत मांडले.
दरम्यान, आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने शहरातील मुस्लिम समाजाने या दिवशी कुर्बानी देण्यात येवु नये बाबत उपस्थित मुस्लिम बांधवांना सुचविण्यात आले होते. त्यावरुन मिटिंग साठी उपस्थित जाकिरखान यासिनखान कुरेशी, इरफान अली सैय्यद यांनी आम्ही सायंकाळी मुस्लिम समाजाची मिटिंग घेवुन बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत जाहीर केला.
भडगांव शहरातील मुस्लिम बांधवांच्या जातीय सलोखा जोपासण्याच्या या निर्णयावरुन सर्वत्र कौतुक होत आहे. दोन्ही सणाच्या पार्शभुमिवर भडगांव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता अबाधित रहावी करिता तहसिलदार भडगांव यांचे दालनात सर्व सदस्यिय शांतता कमिटी पदाधिकारी, अधिकारी यांचे भडगांव पोलीस स्टेशनचे गोपनिय अंमलदार पोहेकॉ/विलास बाबुराव पाटील व पोकॉ/ स्वाप्नल बाळासाहेब चव्हाण यांनी मुख्य आयोजन केले होते.