भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरातील पारोळा चौफुली जवळ असलेले एका दुकानदाराचे दुकान फोडून दुकानातून ४५ हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पन्नेसिंग भीमसिंह राजपुरोहित (वय-४२) रा. कराब रस्ता भडगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे पारोळा चौफुली जवळ मा भवानी बिकानेर स्वीट्स नावाचे दुकान आहे. १ जानेवारी ते २ जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दुकानातील ४५ हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दुकानदार पन्नेसिंह राजपुरोहित यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास पाटील करीत आहे.