भडगावातील “हॉटेल शुभम” कोव्हीड सेंटरसाठी विनामोबदला प्रशासनाकडे सुपूर्द

 

 

भडगावः प्रतिनिधी ।   कोव्हीड रुग्णावर योग्य उपचार करण्यासाठी स्वतःचा हॉटेल व्यवसाय तुर्त बंद करून  हॉटेल शुभमची जागा कोव्हीड सेंटरला विनामूल्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मालक तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार  भोसले यांनी घेतला आहे.

 

विजयकुमार  भोसले यांनी राज्याचे आरोग्यमंत्री, जिल्हधिकारी यांच्याशी स्वतः संपर्क साधुन जागा उपलब्ध करुन देण्याचा मनोदय व्यक्त केला

 

देशात कोरोनाची दुसरी लाट आहे. राज्य शासन बिकट परिस्थितीतुन मार्ग काढत रुग्ण संख्या कशी आटोक्यात येईल यासाठी प्रयत्नशिल आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस रुग्ण वाढतच आहेत . रुग्णासाठी बेड, ऑक्सिजन बेड कमी पडत आहेत .महाराष्ट्रात जळगाव जिल्हा टॉप टेनमध्ये असून शासन, प्रशासन या  परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेच. तरीही वाढती रुग्ण संख्या पाहता काही ठीकाणी ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे रुग्णांना जीव गमवावे लागत आहेत.

 

यासर्व परीस्थितीचा गांभिर्याने विचार करत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार रायभान भोसले यांनी भडगाव येथील स्वमालकीची  “हॉटेल शुभम” तुर्त बंद करून कोवीड सेंटरसाठी विनामूल्य देण्याचे जाहीर केले आहे.  त्या ठिकाणी स्वखर्चाने २० ऑक्सिजन बेडदेखील ते उपलब्ध करून देणार आहेत. याविषयी विजयकुमार भोसले यांनी स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे, त्यांचे स्वीय सहाय्यक निलेश देशमुख, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक .डॉ  एन. एस. चव्हाण यांच्याशी स्वतः संपर्क करून विनंती केली होती. त्याची दखल घेऊन केंद्रीय समितीचे प्रमुख डॉ श्रीकांत श्रीनिवासन (जोधपुर ) , जिल्हा शल्यचिकीत्सक  डॉ . एन एस चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ . भिमाशंकर जमादार, वैदयकीय अधिकारी  डॉ  प्रशांत पाटील यांनी ११ एप्रिल रोजी प्रत्यक्ष हॉटेलची पाहणी केली  जागा अतिशय चांगली , नैसर्गिक व योग्य असल्याचे सांगितले.

 

या  जागेवर कोवीड सेंटर सुरू झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष व मित्र परीवार यांच्या वतीने दोन वेळचे जेवण, सकाळी चहा, नाश्ता, अंडी, दूध विनामूल्य रुग्णांना पुरवू असे आश्वासन सुद्धा प्रहार शहर अध्यक्ष प्रशांत पाटील, प्रहारचे सक्रीय कार्यकर्ते देवा महाजन यांनी दिले.

 

कोरोनाच्या भयावह परिस्थितीमध्ये आपण स्वतःहून दोन पावलं पुढे येऊन नागरिकांची सेवा करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. माणुसकीच्या धर्मातून ही माणुसकी जोपासली पाहिजे. रुग्णांचे प्राण वाचविले पाहिजे. मी स्वतः माझा व्यवसाय बंद करून हॉटेलची जागा व रुग्णासाठी २० बेड व जेवण, नाश्ता आम्ही सर्व प्रहार परिवार मित्र मंडळ मार्फत उपलब्ध करुन देणार आहोत असे विजयकुमार भोसले  ( जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती  पक्ष ) यांनी सांगितले

Protected Content