मुंबई प्रतिनिधी । केंद्रीय गृह मंत्रालयाने युजीसीच्या नियमांच्या अधीन राहून देशातील विद्यापीठांच्या परिक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. यामुळे कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी राज्य सरकारची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
कोरोनाच्या आपत्तीमुळे देशभरातील विविध राज्यांमध्ये विद्यापीठाच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्र सरकारनेही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, राज्यातील भाजप नेत्यांनी परीक्षा व्हावी ही इच्छा व्यक्त केली आहे. राज्यपालांनी देखील याच प्रकारचे सूतोवाच केले होते. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमिवर आज केंद्रीय गृहमंत्रालयाने विद्यापीठाच्या परिक्षांबाबत दिशा-निर्देश जाहीर केले आहेत. यात युजीसीच्या नियमांच्या अधीन राहून परीक्षा घेता येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे राज्यांनी परिक्षा घ्याव्यात असे केंद्राने सुचविले आहे. यावर आता राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार यावर सर्व अवलंबून आहे. याबाबत राज्य सरकारने आधीचाच निर्णय घेतला तर यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तथापि, राज्यातील व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक या दोन्ही प्रकारातील अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार असल्याची शक्यता निर्माण झालेली आहे.