अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आज अमळनेरात बोरी नदीच्या काठावर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
शहरात आज वाजत गाजत भक्तीपूर्ण वातावरणात गणेश मंडळातील तसेच घरगुती बसवलेल्या गणपती बाप्पांना घेऊन भाविक आज सकाळपासूनच बाप्पाला निरोप देत होते. त्यातल्या त्यात बच्चे कंपनीचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. बाप्पाला निरोप देतेवेळी अनेक बाल गोपालांनपासून ते वृद्धांपर्यत अनेकांचे डोळे पाणावले होते. ते मोठया जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देऊन माघारी जात होते.
नगर पालिकेनेदेखील अनुचित प्रकार किंवा दुर्दैवी घटना घडू नये म्हणून शहरात ठीकठिकाणी मुर्ती तसेच निर्माल्य संकलन केंद्र उभारून सोय केली होती. भाविक देखील नदी पत्रात जाऊन पाण्यात मुर्ती बुडवून परत पालिकेच्या संकलन केंद्रावर आणुन देत होते. त्यानंतर पालिका कर्मचारी संकलित केलेल्या मुर्त्या एकत्र ट्रॅक्टरमध्ये भरून देवळी येथील खदाणीत विसर्जनासाठी नेत होते.
पालिकेच्या या उपक्रमामुळे मूर्तींमुळे नदीच्या जल प्रदूर्षणाला देखील आळा बसतो व मूर्तीची विसर्जनानंतरची भंगलेल्या मूर्त्यांची विटंबनादेखील टळते त्यामुळे पालिकेच्या या उपक्रमांची नागरिकांकडून कौतुक केले गेले. विसर्जन मार्गात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासूनच पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांरी देखील परिश्रम करतांना दिसत होते. सायंकाळपर्यत जवळपास दोन हजार लहान मोठ्या गणेश मूर्तीचे संकलन पालिका कर्मचाऱ्यांकडे झाले होते.