*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील बोढरे ग्रामपंचायतीने पाठविलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला नुकतीच प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी १०८.९६ लक्ष रूपयांच्या कामास मंजुरी देण्यात आल्याने गावाला जलसंजीवनी मिळणार आहे.
राज्यात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत शासनाने प्रत्येक घरापर्यंत नळाचे शुद्ध पाणी पोहचवण्याचा संकल्प केला आहे. दरम्यान सव्वाशे गावांच्या पाण्याच्या वर्कऑर्डरचे आदेश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले असून जवळपास अडीचशे कोटी रुपयाच्या पाण्याच्या योजनेस प्राथमिक मान्यता देत विविध गावातील सरपंचांना पाणीपुरवठा योजना मंजुरीचे पत्र देण्यात आले. तत्पूर्वी सदर योजनेअंतर्गत गावात शुद्ध पाणी मिळावे यासाठी बोढरे ग्रामपंचायतीने १०८.९६ लक्ष रूपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविला होता. सदर प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी १०८.९६ लक्ष रूपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते ग्रामसेवक दिपक देवकर व विजाभजाचे गुलाब राठोड यांना वितरीत करण्यात आले. त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून बोढरे गावाला जलसंजीवनी मिळणार आहे. तत्पूर्वी याबाबत ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीचे आभार मानले जात आहे.