पाचोऱ्यात भरदिवसा सव्वा तीन लाखाची चोरी ; गुन्हा दाखल

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील एका किराणा दुकानातून भरदिवसा अज्ञात चोरट्याने ३ लाख २५ हजार रुपये आणि तीन महत्त्वाच्या नोटबुक चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर न्यु सुरेश किराणा दुकान आहे. या किराणा दुकानाचे मालक विजय सुरेशचंद कोडवाणी (वय – ४१) हे नेहमी प्रमाणे सकाळी ९ वाजता दुकानात दाखल झाले. त्यांचेजवळ एक पिशवी होती. त्या पिशवीत ३ लाख २५ हजार रुपये व तीन महत्त्वाच्या नोंद वह्या होत्या. सदरची पिशवी विजय कोडवाणी यांनी दुकानात ठेवली व ते गिऱ्हाईकांना किराणा माल देण्यात व्यस्त झाले. याचा फायदा घेत सदरची ३ लाख २५ हजार रुपये व तीन नोंद वह्या असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लांबविली. काही वेळाने विजय कोडवाणी यांनी पिशवी बघितली असता त्यांना ती आढळुन आली नाही.

विजय कोडवाणी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मुकुंद परदेशी हे करत आहे

 

Protected Content