चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरात बोगस खतांचा साठा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला होता. दरम्यान बोगस खत विक्री करून शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभुत ठरलेल्या व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी कृषी समितीचे राज्य सदस्य विवेक रणदिवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काल शहरात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत आढळून आलेल्या निकृष्ठ व बोगस खताच्या विक्रेत्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभुत म्हणुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अस्मानी संकटांसोबतच सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांवर रोजच आत्महत्यांचा प्रसंग ओढावत असतो नैसर्गिक आपत्ती जरी आपल्या हातात नसल्या तरी मानवी हस्तक्षेपाचे संकट आपण टाळू शकतो परंतु मेलेल्या माणसांच्या टाळुवरील लोणी खाणारे माणसांच्या रुपातील हैवान आजही आपल्या सभोवताली आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभुत असलेल्या अनेक कारणांपैकीच एक म्हणजे नापिकी याला कारणीभुत आहेत सदोष बियाणे, भेसळयुक्त औषधी व भेसळयुक्त खते आणि ते विक्री करणारे विक्रेते शेतकरी इमानदारीने आपले शेतजमिन गहाण ठेवुन बॅंकेकडुन वेळप्रसंगी सावकाराकडुन व्याजाने पैसे उभारत असतो ते चांगल्या प्रतीचे बी बियाणे खते व औषधी खरेदी करुन चांगले उत्पादन हाती येईल व कर्जाचा डोंगर कमी होईल या अपेक्षेने तो रात्रंदिवस काबाडकष्ट करत असतो आणि अशावेळी जर त्याची पैसे देऊनही निविष्ठा खरेदीमध्ये फसवणुक होत असेल तर त्या भेसळयुक्त निविष्ठांमुळे त्याच्या उत्पादनात निश्चितच घट येते व उत्पादन हाती न आल्याने त्याला कर्जफेडीची चिंता सतावते व या चिंतेमुळेच त्याला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. म्हणुनच शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभुत ठरणाऱ्या भेसळयुक्त बी बियाणे, खते व औषधी विक्री करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व शेतकऱ्यांना जगण्याचे स्वातंत्र्य मिळावे असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.