जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असलेल्या बेवारस अंदाजे ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील नेरी नाकाजवळील एसटी डेपो वर्क शॉप जवळ एक अनोळखी महिला अत्यवस्थ अवस्थेत आढळून आली होती. यावेळी स्थानिक नागरीकांच्या मदतीने तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६ एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेची कोणतीही ओळख पटलेली नव्हती. वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना रविवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता महिलेचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.