बूथरचना मजबूत केल्यास आगमी निवडणुकांमध्ये त्याचा फायदा मिळणार — खासदार पाटील

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । विश्रांतीच्या काळात मेहनत घेतल्यास युद्धाच्या वेळेस रक्त सांडावे लागत नाही. म्हणून आता निवडणुका नसल्याने बूथरचना मजबूत केल्यास पुढील निवडणुकांच्या वेळी त्याचा फायदा पक्षाला निश्चित होतील असे प्रतिपादन खासदार उन्मेश पाटील यांनी केले. ते भारतीय जनता पक्षातर्फे बूथ संपर्क अभियान अंतर्गत शहर व ग्रामीण मंडळाची भूषण मंगल कार्यालय येथे आयोजित एकत्रित बैठकीत बोलत होते.  

याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा बूथ संपर्क अभियान प्रमुख सदाशिव आबा, जळगाव लोकसभा प्रमुख सचिन पानपाटील, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, जेष्ठ नेते वसंतराव चंदात्रे, माजी तालुकाध्यक्ष के. बी. दादा साळुंखे,  तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या मंगला भाऊसाहेब जाधव, माजी पंचायत समिती सभापती दिनेश बोरसे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, तालुका अभियान प्रमुख महेंद्र राठोड, महिला मोर्चा शहराध्यक्ष नगरसेविका संगीता गवळी, तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, गिरीष बऱ्हाटे, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ, नमोताई राठोड यांच्यासह आजी माजी जिल्हा परिषद – पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, मार्केट सदस्य, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी जळगाव लोकसभा अभियान प्रमुख सचिन पानपाटील यांनी बूथ रचनेचा आढावा घेत आगामी काळात गट – गण स्तरावर जाऊन बैठका घेण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर बूथ संपर्क अभियान जिल्हा संपर्कप्रमुख सदाशिव आबा पाटील यांनी गाव पातळीवरचा सर्वसामान्य कार्यकर्ता यांना ओळख दिली ही राजकारणात भाजपाने दिलेली देणं आहे असे सांगितले. किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे यांनी चाळीसगाव तालुका बूथरचनेच्या बाबतीत आजपर्यंत जिल्ह्यात अव्वल राहिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील सर्वाधिक चांगली बुथरचना करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकारी यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, बुथप्रमुख हा पक्षाचा आत्मा असून महत्वाचा घटक आहे. मागील काळात काय झाले हे विसरून यापुढे शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख यांची मते जाणून घेऊनच पुढील राजकीय निर्णय घेतले जातील अशी ग्वाही दिली. त्यांच्या सु:ख- दु:खात  कुटुंबातील सदस्य म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी सहभागी होऊ. पंचायत समिती – जिल्हा परिषद निवडणुकीत मागील काळात बंडखोरीमुळे हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या. 

तरीही ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्ते यांच्या पाठीशी ताकद उभी केली. लोकप्रतिनिधी येतात जातात मात्र पक्ष हा अखंडित प्रवाह आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जो पक्ष संघटनेत क्रियाशील असेल, आपले वार्ड–गण–गट यात कार्यरत असेल. त्याचाच विचार केला जाईल. प्रत्येक निवडणुकीनंतर बुथप्रमुख यांचे ऑडीट तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी करावे. मी देखील थर्ड पार्टी ऑडीट करेन अश्या सूचनाही आमदार चव्हाण यांनी केल्या.

 

Protected Content